फवारणी करताय? ‘ही’ चूक टाळा नाहीतर होऊ शकते जीवघेणी विषबाधा

शेतीमध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक यांसारख्या रसायनांचा वापर पिकांचे उत्पादन टिकवण्यासाठी आणि रोग-कीड नियंत्रणासाठी महत्त्वाचा असतो. मात्र या रसायनांचा वापर करताना जर योग्य ती खबरदारी घेतली नाही, तर त्याचा विपरीत परिणाम शेतकऱ्याच्या आरोग्यावर होऊ शकतो. अनेक वेळा अज्ञान, गाफीलपणा किंवा काळजी न घेतल्यामुळे फवारणी करताना विषबाधा, त्वचेचे विकार, श्वसनाचे त्रास, डोळ्यांचे नुकसान किंवा काही वेळा जीवघेण्या आजारांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे फवारणीच्या प्रक्रियेमध्ये शास्त्रीय पद्धतीने व सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून काम करणे अत्यंत गरजेचे आहे.

फवारणी सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम वापरणार असलेल्या रसायनाच्या बाटलीवरील लेबल आणि सूचना पत्रक काळजीपूर्वक वाचावे. त्या लेबलवर रसायनाचे नाव, टाकायचे प्रमाण, कोणत्या पिकासाठी योग्य आहे, किती वेळेत परिणाम होतो, विषारीपणाचा स्तर काय आहे, कोणती काळजी घ्यावी, याची सविस्तर माहिती दिलेली असते. यामध्ये विषारीपणाचे निर्देश रंगीत त्रिकोणाच्या स्वरूपात असतात – जसे लाल त्रिकोण असलेल्या बाटल्या अत्यंत विषारी असतात, पिवळा मध्यम विषारी, निळा कमी विषारी आणि हिरवा फारच कमी विषारी असतो. या रंगांमुळे निरक्षर व्यक्तीलाही त्या रसायनाच्या घातकतेचा अंदाज घेता येतो.

फवारणी करताना वापरणाऱ्या यंत्रांची तपासणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. फवारणी पंप, नळी, नोझल यामध्ये गळती, अडथळा किंवा गंज असेल, तर त्याचा थेंब थेंबात अपव्यय होतोच पण शेतकऱ्याच्या शरीरावर थेंब उडू शकतात. तणनाशकासाठी वापरलेले पंप किंवा टाक्या कीटकनाशकासाठी पुन्हा वापरू नयेत, कारण त्यामुळे मिश्रणामध्ये प्रतिक्रिया होऊन अधिक विषारी परिणाम होऊ शकतो. रसायन तयार करताना थोड्या पाण्यात भुकटी चांगली एकजीव करून मग ती द्रावणात मिसळावी. थेट भुकटी टाकल्यास ती नीट विरघळत नाही आणि एकसंध फवारणी होत नाही.

फवारणी करताना शेतकऱ्याने पूर्ण अंग झाकले जाईल अशी वस्त्रे परिधान करावीत. यामध्ये लांबबाहीचा शर्ट, लांब पायघोळ, हातमोजे, चेहरा झाकणारा मास्क, डोक्यावर टोपी किंवा गमछा, आणि गळक्या नसलेले बूट यांचा समावेश असावा. शक्य असल्यास डोळ्यांसाठी गॉगलही वापरावेत. फवारणी करताना वारं पाठीमागून असावे म्हणजे थेंब चेहऱ्यावर येणार नाहीत. वारं समोरून येत असेल तर फवारणी थांबवावी.

फवारणी करताना किंवा नंतर कधीही खाणे-पिणे, तोंडाला हात लावणे, सिगारेट किंवा तंबाखू वापरणे टाळावे. फवारणी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण अंग साबणाने धुऊन घ्यावे. वापरलेले कपडे वेगळे ठेवून स्वच्छ धुवावेत. उरलेले रसायन जनावरांच्या पाणवठ्याजवळ, विहिरीत किंवा नाल्यात टाकू नये. रिकाम्या रसायनाच्या बाटल्या पुन्हा कधीही घरात, स्वयंपाकात, पाण्यासाठी वापरू नयेत. त्या नियमानुसार नष्ट कराव्यात किंवा पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली विल्हेवाट लावावी.

फवारणीनंतर जर शेतकऱ्याला डोकेदुखी, मळमळ, घाम, थकवा, डोळ्यांची जळजळ, चक्कर, घशात खरजण, छातीत जडपणा यांसारखी लक्षणे जाणवली, तर त्वरित जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. काही वेळा ही विषबाधा हळूहळू वाढते व वेळ गेलेला असतो, म्हणून तातडीने वैद्यकीय उपचार घेणे अत्यावश्यक ठरते.

Krishi Charcha Marathi

Krishi Charcha Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *