सध्या राज्यामधील जर पावसाची परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून येत असून बऱ्याच भागांमध्ये पावसाने उघडीप दिली आहे. परंतु विदर्भाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी पूर्व विदर्भात पाऊस जोरदार स्वरूपात असून आज देखील पूर्व विदर्भातील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. त्यासोबतच पश्चिम विदर्भ व मराठवाड्याच्या तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे नाव असलेले प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख त्यांनी देखील हवामानाचा अंदाज वर्तवला असून नेमके त्यांनी काय म्हटले याबद्दलची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नुकताच त्यांचा हवामान अंदाज वर्तवला व त्यानुसार बघितले तर त्यांनी म्हटले की,राज्यामध्ये खूप दिवसापासून ढगाळ वातावरण असून खास करून डाळिंब उत्पादकांसाठी आता आनंदाची बातमी असल्याचे त्यांनी सांगितले व त्यामागील प्रमुख कारण म्हणजे आज पासून राज्यात सूर्यदर्शन होणार असून ही बाब नक्कीच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. कारण ढगाळ वातावरणामुळे डाळिंब पिकावर खूप मोठ्या प्रमाणावर रोग किडींचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे आता पाऊस उघडीप देणार असल्याने नक्कीच ही बाब डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. पुढे त्यांनी म्हटले की 11 ते 13 जुलै या कालावधीत मात्र संपूर्ण राज्यात सूर्यदर्शन होणार असून पाऊस उघडीप देणार आहे.
तसेच आजपासून राज्यात उष्णतेत देखील वाढ होईल असा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला. म्हणजे राज्यामध्ये सर्वदूर पाऊस होणार नसल्याचे त्यांनी खासकरून नमूद केले. राज्यातील लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड इत्यादी ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाला.परंतु या जिल्ह्यातील काही भागात मात्र अजून पर्यंत चांगला पाऊस झालेला नाही. परंतु त्या ठिकाणी काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल असं त्यांनी म्हटले. परंतु राज्यातील पूर्व विदर्भात मात्र कायम पाऊस राहणार असून साधारणपणे अजून दोन ते तीन दिवस तरी त्या ठिकाणी जोराचा पाऊस राहील असं त्यांनी म्हटले. विदर्भातील नागपूर,वर्धा,भंडारा, गोंदिया अमरावती तसेच अकोला इत्यादी भागांमध्ये चांगला पाऊस राहणार असल्याची त्यांनी सांगितले. परंतु पूर्व विदर्भात देखील 14 जुलैनंतर पाऊस उघडीप देणार असून त्या ठिकाणी देखील सूर्यदर्शन होईल असा अंदाज त्यांनी वर्तवला.
तसेच बीड, लातूर, जालना, अहिल्यानगर जिल्ह्याचा काही भाग, तसेच परभणी जिल्ह्याचा काही भागात अजून देखील चांगला पाऊस पडलेला नाही. परंतु त्या ठिकाणी 14 ते 15 जुलै दरम्यान स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत चांगल्या स्वरूपाचा एक पाऊस पडेल असे भाकीत त्यांनी केले. तसेच पश्चिम विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये जो काही पाऊस सुरू आहे तो देखील उद्यापासून उघडणार असून त्या ठिकाणी देखील सूर्यदर्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे शेतकऱ्यांना सल्ला देताना त्यांनी म्हटले की आता पाऊस उघडीप देणार असल्यामुळे शेतीची खुरपणी तसेच फवारणी सारखे महत्त्वाची कामे करून घेणे गरजेचे आहे. तसेच 17 ते 19 जुलै दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावेल परंतु तो देखील सर्वदूर नसणार आहे. म्हणजेच 20 जुलैपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे पाऊस पडेल अशी स्थिती सध्या तरी नसल्याचे त्यांनी म्हटले. मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण राज्यात चांगल्या पावसाला सुरुवात होणार असल्याचा महत्वपूर्ण अंदाज देखील त्यांनी वर्तवला