सध्या जर आपण संपूर्ण राज्यातील पावसाची परिस्थिती बघितली तर बऱ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळत असून काही भागांमध्ये अजून देखील जोरदार पावसाचे प्रतीक्षा कायम असल्याचे दिसून येत आहे. कोकण परिसरामध्ये तर गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून पुढील चार दिवस देखील कोकणात जोरदार पावसाचा अंदाज कायम असून त्यासोबतच महाराष्ट्राचा घाटमाथा तसेच खानदेश, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि पूर्व विदर्भात पुढील चार दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
इतर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगल्या पावसाची प्रतीक्षा असून कधी चांगला पाऊस पडेल याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना असल्याचे दिसून येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी त्यांचा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. हा अंदाज खास करून विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरणार हे मात्र निश्चित.
पंजाबराव डख यांनी वर्तवलेला हवामान अंदाज
प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सविस्तर हवामान अंदाज वर्तवला व त्यानुसार जर बघितले तर त्यांच्या मते 6 ते 8 जुलै दरम्यान संपूर्ण राज्यांमध्ये पाऊस होईल.परंतु हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात राहील.यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा पाऊस भाग बदलत पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 6 ते 8 जुलै दरम्यान पूर्व आणि पश्चिम विदर्भ मिळून 11 जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार असल्याचे त्यांनी म्हटले
विदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत त्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. परंतु हा पाऊस सर्वदूर पडेल असे नव्हे. जिल्हानिहाय बघितले तर नागपूर, वर्धा, भंडारा,गोंदिया,चंद्रपूर, वाशिम,हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, अकोला तसेच मराठवाडा भागातील जालना, जळगाव जामोद तसेच खान्देश पट्ट्यातील धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये 6 ते 9 या तारखेदरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचाच पाऊस पडेल असे देखील त्यांनी म्हटले. परंतु याच कालावधीत पूर्व विदर्भातील 7 जिल्ह्यांमध्ये मात्र जोरदार पाऊस हजेरी लावणार असल्याचे देखील त्यांनी खास करून नमूद केले.
मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून अंदाज वर्तवताना त्यांनी म्हटले की नांदेड, परभणी, जालना,लातूर,बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी देखील विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल आणि तो देखील भाग बदलत पडेल असं त्यांनी म्हटले. परंतु नांदेड जिल्ह्यात या तीन दिवसात चांगला पाऊस पडेल असे त्यांनी म्हटले. तसेच मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याच्या ७० टक्के भागामध्ये चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले. म्हणजेच एकंदरीत आपल्याला दिसून येते की पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये या कालावधीत पाऊस जास्त राहील व त्या तुलनेत दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाचे प्रमाण कमी राहील. परंतु नाशिक आणि कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये जो काही जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे तो पाऊस तसाच त्या ठिकाणी सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर या भागाच्या पलीकडे देखील सरींवर सरी स्वरूपाचा पाऊस सुरू राहील असे त्यांनी म्हटले. परंतु वर्धा, नागपूर तसेच गडचिरोली,भंडारा, अमरावती, वाशिम इत्यादी जिल्ह्यांमध्ये मात्र या कालावधीत जोरदार पाऊस असणार आहे. त्यानंतर मात्र 13 जुलै ते 27 जुलै या कालावधीत वातावरणात बदल होऊन जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात होईल असा महत्त्वपूर्ण अंदाज त्यांनी शेवटी वर्तवला.परंतु १० जुलै पर्यंत राज्यात विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस राहील असे त्यांनी खासकरून नमूद केले.