उसात उन्हाळी नाचणीचे आंतरपीक…

कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम घाटाच्या डोंगरी पट्यातील शाहूवाडी तालुका. भात, नाचणी, रताळे ही मुख्य पिके. काही पट्यात ऊस लागवड वाढत आहे. गेल्या चार,पाच वर्षात या भागातील काही प्रयोगशील शेतकरी भाजीपाला, कलिंगड लागवडीकडे वळले आहेत. त्यापैकीच एक आहेत वालूर गावचे मिलिंद सबनीस. मिरची, ऊस, केळी, बांबू, भाजीपाला रोपवाटिका, कलिंगड लागवडीकडे ते वळले, प्रयोगातून पीक बदल हे त्यांचे सूत्र राहिले आहे.

शेती प्रयोग, आंबा, पशुपालन या तीन गोष्टीमुळे गेल्या चार वर्षात आमची दोस्ती पक्की झाली. कधी आंबा गावातील माझ्या शेतीवर तर कधी मी त्यांच्या वालूर गावातील शेतीमध्ये भेटीगाठी ठरलेल्या. यंदा त्यांनी उन्हाळी हंगामात उसात नाचणीचे आंतरपीक घेतले. आमच्या चर्चेतून हा प्रयोग करण्याचे धाडस मिलिंद दादांनी केले. त्यांच्या या प्रयोगाला साथ मिळाली ती कोल्हापूर येथील नाचणी व पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रमुख आणि माझे मित्र डॉ. योगेश बन यांची. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पॅटर्न यशस्वी झाला आहे.
  कोल्हापुरी भाषेत सांगायचे झाले तर,  हा प्रयोग ऐकून लोकांनी येड्यात काढले होते. उन्हाळी नाचणी ..असं कसं शक्य आहे? पण मिलिंद दादांनी काय व्हायचे ते होऊ दे..बघूयात प्रयोग करून यावर ठाम राहिले. अन आज 'फुले कासारी' ची कणसे यशस्वी प्रयोगाची साक्ष देत आहेत...

थोडक्यात हा प्रयोग असा….सबनीस यांनी रब्बी हंगामात एक एकर क्षेत्रावर सरी वरंबा पद्धतीने पेपर प्लास्टिक आच्छादनवापरून कलिंगडाचे चांगले उत्पादन घेतले. त्यानंतर चार फूट सरीमध्ये जानेवारी महिन्यात ऊस लागवड केली. रोपवाटिकेत नाचणीची डिसेंबर महिन्यात पेरणी करून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाचणीची रोपांची उसातील मधल्या पट्यातील प्रत्येक वरंब्यावर तीन ओळीमध्ये आच्छादन पेपरमध्ये छिद्र पाडून लागवड केली. पिकाचे बारकावे समजून घेत अतिशय मेहनतीने ठिबक सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन केले. सर्व बाबींवर बारकाईने लक्ष देत अतिशय चांगली पीक वाढ झाली. जीवामृत व इतर सेंद्रिय निविष्ठा वापरल्या.
उन्हाळी हंगामात लागवड केल्याने वाढीच्या अवस्थेत कीड, रोग नियंत्रणासाठी कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी घेण्याची गरज पडली नाही. ऊस पिकातील खुरपणीचा खर्च वाचला. पिकाची झालेली अतिशय चांगली वाढ, कमी उत्पादन खर्च आणि जनावरांना सकस चारा यामुळे उन्हाळी नाचणीने आम्हाला नवी दिशा दाखवली आहे. थोडक्यात शाहूवाडी पटर्नची रुजवात झाली आहे.

  • अमित गद्रे, पुणे
Krishi Charcha Marathi

Krishi Charcha Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *